जळगाव : जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे बुद्रुक येथे शुक्रवारी शाळेतून घरी येताना रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेल्या 9 वर्षीय धनश्री उमेश शिंदे हिचा मृतदेह अखेर सापडला आहे . तब्बल चार दिवसांनी गावाशेजारील एका विहिरीत हा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडालीय. धनश्री ही जिल्हा परिषद शाळेत चौथीच्या वर्गात शिकत होती. शुक्रवारी (12 डिसेंबररोजी) सकाळी 10 वाजता शाळेत गेलेली धनश्री सायंकाळी घरी न परतल्याने शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सायंकाळी सुमारे 4.55 वाजता ती ग्रामपंचायत कार्यालयाजवळून जाताना दिसून आली होती. त्यानंतर गावाबाहेरील शेत रस्त्यावर तिचे दप्तर आढळून आल्याने अपहरणाचा संशय बळावला होता.
दरम्यान, आज गावालगतच्या शिवारातील एका विहिरीत धनश्रीचा मृतदेह आढळून आलाय. घटनेची माहिती मिळताच जळगाव एलसीबीचे पथक व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी चाळीसगाव तालुका पोलीस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल असून, मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेमागील परिस्थितीचा सखोल तपास एलसीबी व पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 60 ते 70 तासांहून अधिक काळ चाललेल्या शोधमोहीमेचा दुर्दैवी शेवट झाल्याने कुटुंबीयांचा आक्रोश अनावर झाला असून संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.
जळगावच्या भडगाव शहरातून मन सुन्न करणारी घटना समोर आली असून आदर्श कन्या विद्यालयातील इंग्लिश मीडियम नर्सरीत शिकणारे चार वर्षीय ज्ञानेश्वर मयंक वाघ व अंश सागर तहसीलदार हे दोन विद्यार्थी शाळेच्या परिसरालगत असलेल्या नाल्यात पडून बुडाल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी सुमारे 11 वाजता उघडकीस आली.
पुराच्या पाण्यामुळे शाळेच्या परिसराला संरक्षण देणारी भिंत कोसळली होती. याच नाल्याजवळ विद्यार्थ्यांची बाथरूम असल्याने तेथे गेलेल्या दोन्ही चिमुकल्यांचा पाय घसरून नाल्यात पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेनंतर दोघांना तातडीने भडगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर पालकांनी काळीज चिरणारा आक्रोश केला असून शाळा प्रशासनाच्या भोंगळ व दुर्लक्षित कारभारामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.